ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेची पोहच सुधारण्याची गरज, उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2021 : उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू (Shri M. Venkaiah Naidu) यांनी ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाबाबत सर्वसमावेशक दृष्टिकोण बाळगण्याचे आवाहन केले आहे. पोहच, गुणवत्ता आणि सुविधा परवडणे यासारखे मुद्दे महामारीच्या काळात वाढू शकतात. या प्रक्रीयेचा फटका अनेक विद्यार्थ्याना बसू शकतो याबाबत त्यांनी सावध केले.

ऑनलाईन शिक्षणाची ताकद विषद करताना हा दुर्गम भागातील लोकांसाठी डिजिटल पूल असल्याचे ते म्हणाले. यापासून सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी वगळले जाऊ नयेत आणि याचे पर्यवसान डिजिटल विभाजनात होऊ नये याची दक्षता घ्यायला हवी यावर त्यांनी जोर दिला.

श्री नायडू यांनी भारत नेट सारख्या प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली. ज्या संस्था सीएसआर उपक्रमाअंतर्गत येतात त्यांनी, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राधान्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुरवावीत, अशी इच्छा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

श्री नायडू यांनी भारतीय भाषांमधील ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले आणि शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील खाजगी संस्था-व्यक्तींना प्रादेशिक भाषांमध्ये अध्क साहित्य उपलब्ध करण्याचे आवाहन केले.

आंध्रप्रदेशातील अनंतपुरमुच्या केन्द्रीय विद्यापीठाच्या पहिल्या स्थापना दिन सोहळ्यात उपराष्ट्रपतींनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन केले. उच्चशिक्षण, समुदायासाठी मोठे आर्थिक उत्प्रेरक कसे बनू शकते, एखाद्या प्रदेशात कसा विकास घडवून आणू शकते आणि देशाच्या विकासाला ते चालना देखील देऊ शकते हे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.  केंद्रीय विद्यापीठ राज्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला गती देईल आणि रायलसीमा प्रदेशाच्या क्षमतेला खुले करेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 (National Education Policy (NEP) 2020) मध्ये विविधांगी आणि समग्र शिक्षणावर भर असल्याचे नमूद करून, सर्व विद्यापीठांमध्ये मानव्य विद्या  आणि सामाजिक विज्ञानविषयक शिक्षण बळकट करण्याचे आवाहन श्री नायडू यांनी केले.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, , डॉ. आदिमुलापू सुरेश, शिक्षण मंत्री,  आंध्र प्रदेश, प्रा.एस.ए. कोरी, कुलगुरु, केन्द्रीय विद्यापीठ आंध्रप्रदेश, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह अनेकजण या आभासी कार्यक्रमावेळी उपस्थित होते. (PIB)

 

Leave A Reply