कर्जत जामखेड तालुक्यातील जि. प शाळांना Amazon कडून आ. रोहित पवारांच्या हस्ते मोफत स्मार्ट टॅबचे वाटप

 समृध्द गाव संकल्प योजनेतील कर्जत जामखेड तालुक्यातील जि. प शाळांना अमेझॉनकडून आ. रोहित पवारांच्या हस्ते मोफत स्मार्ट टॅबचे वाटप

कर्जत जामखेड तालुक्यातील समृद्ध गाव संकल्प योजनेत 40  ग्रामपंचायती निवडण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 76 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अॅमेझाॅन इंडिया या कंपनी मार्फत 250 स्मार्ट टॅबचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि ग्रामपंचायत म्हाळंगी यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अमेझाॅन इंडिया या कंपनीचे  वरिष्ठ अधिकारी कम्युनिटी एंगेजमेंट मॅनेजर श्री चैतन्य पाठक, लिडरशीप फाॅर इक्वालिटीचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मधुकर रेड्डी, वरिष्ठ व्यवस्थापक श्री मयुरेश भोईटे उपस्थित होते.  अॅमेझाॅन इंडिया या कंपनीने अतिशय अद्ययावत असे सुमारे 1 हजार स्मार्ट टॅब महाराष्ट्रातील काही जिल्यात वितरीत करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाची निवड त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर केली असून 250 टॅबचे वाटप आज करण्यात आले. अॅमेझाॅन इंडियाचे चैतन्य भोईटे यांनी टॅबच्या माध्यमातून मुलांना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसे शिक्षण घ्यायचे याची माहिती मिळणार असल्याचे, मनोगत व्यक्त करताना सांगितले. अॅमेझाॅन इंडियाने टॅबच्या माध्यमातून सुमारे चाळीस लाख रूपयांची मदत कर्जत जामखेड मतदारसंघात दिली आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आमदार रोहित (दादा) पवार हे होते. त्यांनी बोलत असताना अॅमेझाॅन कंपनी ही जगातील सर्वात जास्त मूल्य असलेली कंपनी असल्याचे सांगत ही कंपनी सामाजिक बांधीलकी जपत असल्याचेही आवर्जून नमूद केले. अॅमेझाॅन कंपनी सोबतच लीडरशिप फाॅर इक्वालीटिचे संस्थापक व मुख्य कार्यकारी  अधिकारी,  मधुकर बानुरी ( रेड्डी) आणि वरिष्ठ व्यवस्थापक श्री मयुरेश भोईटे यांचेही देणगी बाबत आभार मानले. ग्रामीण भागातील मुला-मुलींना शहरातील शैक्षणिक सुविधा व आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील राहील असेही रोहित दादांनी स्पष्ट केले.  या कार्यक्रमास कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव आणि जामखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी  डॉ प्रकाश पोळ उपस्थित होते. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त  करतानाच अॅमेझाॅन कंपनीचे आभार मानले. 

या कार्यक्रमास समृद्ध गावातील अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक , ग्रामस्थ मोठ्या संख्येत  उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात दहा शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. म्हाळंगी गावच्या सरपंच सौ.जगताप यांनी प्रास्ताविक करताना म्हाळंगी ग्रामपंचायतीने मागील 10 महिन्यात केलेल्या विविध जलसंधारण  कामांचा  व इतर  विकास कामांचा  तपशील सांगितला. गावातील तरूण रोज दोन तास स्वच्छतेसाठी श्रमदान करत असल्याचे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमास कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे महाव्यवस्थापक यशवंत शितोळे उपस्थित होते. या संस्थेमार्फत व ग्रामपंचायत म्हाळंगी यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top